मराठी विवाहसोहळा

 

ग्रहमख व केळवण


 

सर्व साधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्याच्या आधी घरी ग्रहमख हा विधी करण्याची पध्दत आहे. (वेळेअभावी ग्रहमखाचा नुसता संकल्प सोडून कार्य झाल्यानंतरही तो करता येतो.) या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता (शांती) मिळविणे हा उद्देश असतो. हा पूर्णतः धार्मिक विधी असतो व लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी घरीच केला जातो. ह्या दिवशीच वधूला चुडा भरण्याची प्रथा आहे. हिरवा चुडा भरल्यावर वधूने घराबाहेर पडायचे नसते. 'केळवण' हा कार्यक्रमही याच दिवशी होतो. केळवण म्हणजे वधू अथवा वराला लग्नाआगोदर दिलेली मेजवानी.

 
 

मेंदी काढणे व बांगडया भरणे

कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा राजस्थानातला रिवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय झाला आहे. मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोटयापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा आहे. मेंदी काढणा-या खास स्त्रिया असतात. तसेच सौंदर्यगृहातूनही अशा प्रकारची सेवा उपलब्ध होते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या व-हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडया, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. चुडा भरताना एकेका हातात सात-सात किंवा नऊ-नऊ बांगडया घालतात. त्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पध्दत आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर व-हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगडया भरतात. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF