मराठी विवाहसोहळा

 

घाणा भरणे


 

लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला 'घाणा भरणे' असे म्हंटले जाते. हा समारंभ वधूच्या घरी तसेच वराच्या घरीही ghanaलग्नाच्या दिवशी साजरा केला जातो.हल्ली हा समारंभ कार्यालयातच होतो. आंब्याच्या पानांनी तसेच हळदीत बुडविलेल्या स्वच्छ चिंधीने किंवा जाड धाग्याने मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू/वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळ, गहू , तीळ अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. खेडेगावातून, हे कांडलेले धान्य पुन्हा सुशोभित जात्यावर दळून वडयांच्या पिठात घालण्याची पध्दत आहे. यानंतर घाणा भरणा-या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून त्यांची खणानारळाने ओटी भरण्याची पध्दत आहे. घाणा भरून झाल्यावर वधू-वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना पाटावर बसवून सुवासिक तेल-उटणे लावतात. हा विधी लग्नाच्या दिवशीच सकाळी सुरुवातीला होतो. या कार्यक्रमापासून सनई, चौघडा अशी मंगल वाद्ये वाजविण्याची पध्दत आहे.

 
 

हळद लावणे

यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे हळद लावणे. हा विधीही लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. तेल उटणे लावून झाल्यावर वधू व तिचे आई-वडील यांना हळद लावतात. हळदीची पूड पाण्यात कालवून ती चेहरा व हातपायांना लावण्याची पध्दत आहे. त्यावेळी प्रसंगानुरूप गाणीही गातात व नंतर त्यांना मंगल स्नान घालतात. त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत-गाजत वराच्या

बि-हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई-वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते. वधूपक्षाकडून हळद घेऊन येणा-या सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरून , फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.

शेतकरी वर्गामध्ये हळदी समारंभाला फार महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा विधी खूप वेळ चालतो व तो आदल्यादिवशीच करतात. यावेळी काही विनोदी, वधु-वरांची मस्करी करणारी, किंवा भावनोत्कट अशी गाणी म्हंटली जातात. वधू- वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना मध्ये बसवून त्यांच्याभोवती फेर धरून थोडेसे नाचून गाणी म्हंटली जातात व त्यांना ओवाळतात. आरतीत मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील पैसे घालतात व ते ओवाळणा-या सुवासिनींमध्ये वाटून घेतले जातात. हळदीसाठी जमलेल्यांना मटणाचे जेवण देतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF