मराठी विवाहसोहळा

 

सीमांत पूजन


 

आजकाल लग्न कार्यालयांमधून होत असल्याने तसेच वेळेअभावी आदल्या दिवशी करण्यात येणारे विधी लग्नदिवशी सकाळीच होतात.

पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे व-हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई-वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला 'सीमांत पूजन' असे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आईवडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. वरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला 'ज्येष्ठ जावई पूजन' म्हणतात. त्यानंतर वराचे आई-वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो. काहीजणांकडे यावेळी कढी-भाताचे जेवण देण्याची पध्दत आहे.

 
 

तेलफळ

लग्नाच्या दिवशी पहाटे मुलाकडील सुवासिनी मुलीकरिता 'तेलफळ' आणतात. आता मुलगी 'वधू' या भूमिकेत आहे व लवकरच विवाहिता होणार आहे यासाठी हिरवी साडी, चोळी, एखादा दागिना व ५ फळांनी वधूची ओटी भरतात. गौरीहरापाशी पहिली ओटी भरावी असे शास्त्र आहे.

 
 

देवक बसविणे

लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे 'देवक बसविणे'. वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते. 'देवक' म्हणजे संरक्षण. पुण्याहवाचनाचा विधी करताना वधूपिता, वधूमाता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात. हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो. यावेळी देश, काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधूपिता व वरपिता यांचे देवऋण फिटावे, धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो. देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात. कुलदेवतेचे स्मरण करून अविघ्न कलशाची स्थापना करतात. २७ सुपा-यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या ६ देवतांनी नन्दिनी आदि देवतांना आवाहन करण्यात येते. लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात. २७ देवतांची स्थापना तांदूळ, गहू पसरून केली जाते.हे सूप देवापुढे ठेवले जाते. सुपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते. मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घडयासारखे आहे याचे ते द्योतक आहे. ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उपभोगतो येतो. घडयाशी खेळले तर तो भंग पावेल. देवक स्थापनेपासून देवकोत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणा-यांना सोयर-सुतक इ. व्यावहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही. देवक बसते त्याच वेळी घरचे लोक व नातेवाईक, वधू-वर आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात. याला 'घरचा आहेर' म्हणतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF