|
संस्कृती, एक टिपण
संस्कृती ही अत्यंत व्यापक असते. तिच्या उदरात मानवी कृतींचे (ब-या-वाईट) विराट विश्व सामावलेले असते. संस्कृती ही पा-यासारखी असते. कोणाच्या हातात येत नाही, निसटून जाते व दशांगुळे उरते. अनेक थोर लोक व विद्ववान संस्कृतीवर लिहितात व बोलतात. द.के.केळकर (उद्याची संस्कृती), साने गुरूजी (भारतीय संस्कृती), ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी रामधारी सिंह दिनकर ( 'संस्कृती के चार अध्याय', प्रस्तावना पं. जवाहरलाल नेहरू) , रवींद्रनाथ टागोर (Nationalism सांस्कृतिक राष्ट्रवाद), संपादक, एस.डी. कुलकर्णी (Beginnings of Life Culture and History 1988), इरावती कर्वे (मराठी लोकांची संस्कृती), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वैदिक संस्कृतीचा विकास), डॉ. चि.ग.काशीकर (वैदिक संस्कृतीचे पैलू) याशिवाय प्रसंगानुसार विनोबा भावे, स्वामी विवेकानंद, आचार्य रजनीश आदींनी ही संस्कृतीवर भाष्य केले आहे. नोबेल पारितोषिक विजेते ऑर्थर कोसलरचे वाक्य ' There are islands of culture ' प्रसिध्दच आहे.
संस्कृती व संस्कार यात भेद आहे. काहीजण संस्कार हा धर्मापुरता मर्यादित मानतात पण शिक्षण, विद्या, संस्कृती, आचार-विचार, शील आदी क्षेत्रातही कळत नकळत संस्कार होतच असतो. संस्कृतीला इंग्लिशमध्ये 'कल्चर' म्हणतात. हा 'कोलेरे' (Colere) या लॅटिन शब्दापासून आला. आपणाकडे संस्कार शब्द होता पण कल्चरला पर्याय वाचक शब्द नव्हता. इतिहासाचर्य वि. का. राजवाडे यांनी कल्चरला संस्कृती हा पर्यायवाचक शब्द दिला आहे. कल्चर म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रात (Microbiology) जीवाणूंच्या पेशी वाढविणे या अर्थी वापरतात.
कल्चरचे दोन अर्थ आहेत. एक वर आपण पाहिलाच आहे. दुसरा 'The arts and intellectual achivements regarded as whole' (Oxford English Dictionary 2003. page 107). कल्चर शब्द हा ऍ़ग्रीकल्चरपासून आला आहे. कल्चरचे भाषातंर संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग ज्यांना आपल्या कलेचे श्रेष्ठ मानदंड असलेले 'सत्यम, शिवम, सुंदरम' हे वेदातील नसून Truth, Goodness, Beauty यांचे भाषांतर आहे. दुर्गाबाई भागवतांनी संस्कृत महापंडिताशी वाद विवाद करून त्यांना पटवून दिले आहे. आपल्या रोजच्या उपयोगातील वार व वारांची नावे, राशि इ. हे ग्रीकांकडून तसेच संपूर्ण तास, मिनिटे, सेंकद हे इंग्रजाकडून आपण घेतले. आपण नक्षत्र, पळ, घटिका, प्रहर तसेच प्रतिपदा, व्दितीया आदी तसेच पक्ष (शुक्ल/कृष्ण) पूर्वी रोजच्या व्यवहारात उपयोगात आणत असू. संस्कृती ही मिश्र व समन्वयात्मक असते. कारण मानव हाच मिश्रित वंशाचा व रक्ताचा आहे. शुध्द वंशाचा मानव पृथ्वीवर कधीही नव्हता व नाही.
काहींचे म्हणणे असे आहे की इ.स. पूर्व ९००० वर्षांपर्यंत मानव संस्कृतीच अस्तित्वात नव्हता. भारतीय उपखंडात व मध्य आशियात, इ.स. पूर्व .शेतीस प्रांरभ झाला. शेतीचा शोध हा संस्कृती निर्माण होण्यात महत्त्वाचा टप्पा आहे. शेतीमुळे माणसाला स्थैर्य आले. तत्पूर्वी त्याचे आयुष्य भटके होते. (आर्य शब्दाचा एक अर्थ भटक्या वा फिरस्ता असाही आहे) आधुनिक मानवाचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात......ऐशी हजार वर्षापूर्वी एका निग्रो मातेच्या पोटी झाला हे डीएनएच्या आधारे सिध्द झालेली विज्ञानमान्य गोष्ट आहे. आदिमानव रानटी असतांना पाच लाख वर्षापूर्वी अग्निचा शोध लागला. ५०-६० हजार वर्षापूर्वी पशुपालन सुरू झाले तर शेती ही मध्य आशियात अठरा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. ख्रिस्तपर्व ८००० ते ९००० वर्षांपूर्वी चीनमध्ये भातशेती सुरू झाली. यूरोप, इजिप्त, व भारतात शेती ही ख्रिस्तपूर्व सहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. ख्रिस्तपूर्व, कुंभाराच्या चाकाचा वापर भारतात सुरू झाला. अग्नी व चाक हे मोठे शोध होते ज्यामुळे मानवी जीवनात क्रांती आली.
कृषिसंस्कृतीच्या पूर्वी आदिमानवाची शिकारी संस्कृती होती. आदिमावन हा हत्यारांनी प्राण्यांची शिकार करून जीवन कंठित असे. आधुनिक अघतन संशोधनानुसार आदिमानव प्राण्यांची प्रत्यक्ष शिकार न करता वाघ, सिंहा आदी प्राण्यांनी इतर प्राण्याच्या केलेल्या शिकारीचा उरला सुरला भाग मांस व अस्थी भाग घेऊन येत असे. किंवा वाघ सिहांदी प्राण्यांना हाकारे घालून त्यांना दूर पळवून सिंहादी प्राण्यांनी केलेली शिकार गुहेत आणीत. उत्खननात आदिमानवाचे जी हत्यारे सापडली त्या हत्यारांनी आदिमानव शिकार करू शकत नसे हे सिध्द होते. ती हत्यारे शिकार करण्यास योग्य नव्हती. तो त्या हत्यारांनी आणलेल्या शिकारीचे मांस व अस्थी तोडू शकत होता. आणि त्यावर जीवनयापन करू शकत होता. शिकार मिळविण्यासाठी त्याला अनेक किलोमीटरचा (२०-२५) फेरा पडे. जंगली प्राण्यांवर हल्ला करण्याइतकी शक्ती त्याच्या शरीरात नव्हती. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी शरीराने व शक्तीने दुबळाच होता. आदिमानवाला शिकारी म्हणणे निरर्थक आहे. रानटी आदिमानवाच्या हातात जेव्हा भाला व धनुष्य-बाण ही आफ क्षेपणास्त्रे (फेकून मारण्याची शस्त्रे) आली तेव्हा तो खरा शिकारी बनला. रानटी माणसांची आपली एक संस्कृती होती. त्याला स्थूल कलेची जाण होती. संस्कृती एक कला आहे. फ्रान्स देशात अलीकडेच मँटिग्रँकजवळ गुफा सापडली, त्या गुहेचे तोंड झाडाच्या ढोलीच्या आड लपलेले होते. त्यातून गुहेत उतरताच पंधरा हजार वर्षांपूर्वीची बैल, घोड, गवा, हरिण, काळवीट यांची चित्रे सापडली. हा प्राचीनतम असा कलेचा अविष्कार मानला जातो आहे.
संस्कृतीमध्ये प्रकृती-विकृती असा भेद नाही. संस्कृती, सदाचारण बरोबर समाजातील अंधश्रध्दा, अमानुष रूढी दुराचारण यांनाही ऐतिहासिक महत्त्वाच्या दृष्टीने संस्कृतीत स्थान असते. जे केवळ सदाचार, संस्कृतीसह अनुभव इत्यादी सद्चाच समावेश संस्कृतीत करतात ते संस्कृतीला समग्रतेने न पाहता तुकडया तुकडयांनी पाहतात जे अनुचित आहे. कृषिसंस्कृतीतून संस्कृती उदय पावली कारण कृषिसंस्कृतीमुळे मानवाच्या जीवनाला स्थैर्य मिळून त्याला बुध्दी कल्पकता व हात यांचा वापर करून नवनिर्मितीला वाव मिळाला. त्याच्या प्रतिभेला करागिरीला (घरे बांधणे इत्यादी) पंख फुटले, तरीही काहीजण कृषिसंस्कृतीला आजच्या नाशास जबाबदार धरतात. त्यांचे म्हणणे असे की ज्या दिवसापासून माणसाने शेती करण्यास प्रांरभ केला त्या दिवसापासून त्याने निर्सगात ढवळाढवळ करावयास प्रारंभ केला व पशुपालनामुळे स्वत:ही रोगग्रस्त झाला. अर्थात ही भूमिका कोणालाही पटणे शक्य नाही.
काहीचे म्हणणे असे आहे की अनेकवार झालेल्या संस्कारांचा समुच्चय म्हणजे संस्कृती, पण ते खरे नाही. संस्कार हा कळत नकळत होतच असतो. मानवाच्या जीवनाचा अंर्त:बाहय सर्व अनुभवांच्या संचिताचा भाग म्हणजे संस्कृती. मानवजीवनाच्या अंतर मनाला समृध्द व प्रगल्भ बनवणारे तत्वज्ञान, कला, संगीत साहित्य इत्यादी येतील तर बाहय भागात सभ्यता (Civilization) म्हणजे रोजच्या जीवनाला उपयुक्त गोष्टी येतात. उदा. रस्ते, पुल, कालवे, धरणे, रेल्वे, सूईपासून ते जेटविमानापर्यंत सर्व, यामुळे मनुष्याचे भौतिक जीवन सुखी होते. याबाबत एक विधान आहे. Wisdom lingers, Civilization advances but Culture is always one day behind. अर्थात सभ्यता वेगाने पुढे जाते पण संस्कृती मागे पडते. विद्वतेप्रमाणे रेगांळते कारण तिला संचय करायचा असतो. सभ्यता ही एका ठराविक काळापुरती, विशिष्ट लोकसमूहापुरती अशी भौगोलिक, ऐतिहासिक, वांशिक व कालमर्यादित असते. प्रत्येक संस्कृतीचा विकास हा उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती व तिची सृजनशीलता यावर अवलंबून असतो. त्यात गतिमानता मूलभूत असते. मातीचे भांडे निर्माण करणे ही सभ्यता. कारण त्यातून पाणी पिता येते. पाण्याने तोंड धुता येते पण त्या मातीच्या भांडयावरील (पात्रावरील) चित्रे व फुलांची, वेलींची नक्षी ही कला संस्कृती. आदि मानवाची चित्रे, हत्यारे, खाणेपिणे, निसर्गपूजा, त्याच्या श्रध्दा, अंधश्रध्दा आदिमानवाच्या संस्कृतीत आपण समाविष्ट करतो. हडप्पा येथे जे उत्खननात झाले त्यात सापडलेली सामुग्री ही आपण सिंधू संस्कृती म्हणूनच ओळखतो.
इतिहासात श्रेष्ठ संस्कृती ही दुर्बल गौण संस्कृतीला पुसून टाकते. सांस्कृतिक वसाहतवादाचा तीव्र प्रतिकार करणे आवश्यक आहे. आजच्या वैश्विक संस्कृतीला किंवा बहुविध संस्कृतीला सांस्कृतिक वसाहतवाद बाधा पोहचवतो. संस्कृती ही भाषेव्दारे अभिव्यक्त होत असते. संस्कृतीचा मुलाधार समाज असतो. व्यक्ती किती ही स्वायत्त/बलवान व मेधावी असली तरी समाजाविना संस्कृतीची निर्मिती होऊ शकत नाही. समाजाचा जो पुंजित अनुभव असेल तो संस्कृतीमध्ये उतरल्यानंतर जी आनंदप्रद निर्मिती होती ती संस्कृती होय.
संस्कृतीमध्ये समाजाचा अनुभव आनंदाने अभिव्यक्त होत असतो. आदिम संस्कृती ही बंदिस्त होती. कारण तिच्यामध्ये वक्ता-श्रोता व अंतराळ-अंतर म्हणजे डोळा, कान व अंतर ही त्रिमिती होती. पण वाणीमय भाषेची जागा लिपीने घेताच त्याठिकाणी शब्द, लांबी आणि डोळा - रूंदी ही द्विमिती आली आणि त्यामुळे बंदिस्त (क्लोज) ऐवजी खुली (ओपन) संस्कृती आली. तसेच लिपीबध्द लिखित भाषेमुळे एक अलिप्तता आली. मानवी विराट संस्कृती ही मानवी सुधारणा, सभ्यता व कलादी यांच्या बळावर उभी असते व भाषा तिची एक अनिवार्य वाहक असतो.
कोणतीही संस्कृती सर्वश्रेष्ठ नसते. प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणेच प्राचीन इजिप्शियन, बॅबिलॉनियन, सुमेरियन, खाल्डियन, चीनी इत्यादी संस्कृती पण श्रेष्ठ होत्या. भारतीय संस्कृती विषयी अभिमान बाळगावा पण दुराभिमान नसावा. आपण भारतीय संस्कृती आध्यात्मिक व पाश्चात्य संस्कृती आधिभौतिक मानतो. यासाठी पु.ल. देशपांडे यांचे वाक्य प्रसिध्दच आहे,''त्यांची (पाश्चात्याची) द्राक्ष संस्कृती व आमची (भारतीय) रूद्राक्ष संस्कृती आहे''. हा 'द्राक्ष' शब्दाचा खेळ आहे. या विधानात सखोलता व व्यापकता नाही तर वरवर मांडलेला चमकदार क्षणिक विचार आहे. कोणतीही संस्कृती ही पूर्णत: अध्यात्मिक अथवा अधिभौतिक ऐहिक नसते. हा भेद निरर्थक आहे. प्राचीन संस्कृतीपासून आजपर्यंतच्या संस्कृतीपर्यंत सत्ता, संपत्ती, सुंदरी यासाठी लालसा आहेच. भारताच्या प्रागैतिहासिक व ऐतिहासिक काळात याची उदाहरणे मिळतात. अश्वमेध यज्ञ, नंतर यज्ञसंस्कृतीत अश्वमेध व त्याचे मांस खाणे, नंदवंश विलासात मग्न राहणे, यज्ञसंस्कृतीविरूध्द उभा ठाकलेला बुध्दधर्म, त्या बुध्दधर्मात मठात विहारात स्वैराचार सुरू राहणे, अगदी प्राचीनतम उदाहरण घेतले. आख्यायिकानुसार तर शांतिब्रम्हाचे वसिष्ठऋषींचे अभिऋषींवर संतप्त होणे, ब्रम्हार्थी विश्वमित्राने विसिष्ठऋषींचे शंभर पुत्रा मारणे व कामधेनुची कामना करणे. याउलट तत्वासाठी प्राण देणारा शास्त्रज्ञ ब्रूनो, सॉक्रेटिस आहेत. तसेच छळवाद सहन करणारे शास्त्रज्ञ ऍ़रिस्टॉटल, रॉजर बेल्लन ही आहेत. मुळातच मनुष्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती लोभ, मद, मत्सर इत्यादी आहेत. त्यांचे उदात्तीकरण (Sublimation) होऊ शकते पण तुरळकच त्यामुळे अध्यात्मिक संस्कृती हे एक कल्पनारंजन व स्वप्न आहे.
सारांश कोणतीही संस्कृती आद्यन्त, विशुध्द, अमिश्रित, पवित्र नसते. ती समन्वयात्मक असते. ती बाहय संस्कृतीपासून मुक्त राहू शकत नाही. अन्य संस्कृतीच्या संपर्कात आल्याने एक नवा संस्कार मानवास मिळतो. एक नवी परिस्थिती (डायमेन्शन) मिळते. आज मंगळावर जाण्यास सज्ज झालेल्या मानवास प्रादेशिक व राष्ट्रीय सीमा ओलांडून एका नव्या पृथ्वीग्रह संस्कृती (Planet Earth Culture) निर्माण करावयाची आहे. त्यासाठी मनाने, बुध्दीने, विवेकाने सज्ज होणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.
डॉ.सुधाकर कलावडे,
पुणे
|
|

|