MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

संस्कृती > लेख

श्रावणसरींबरोबरचे सणवार

आषाढ संपतो नि वेध लागतात श्रावणमासाचे. पावसांच्या सरीवर सरी बरसतात आणि वेडं मन गाणही गाऊ लागतं. धरतीची तृष्णा भागविणारा वरूणराजा सर्वांनाच तृप्त करतो. मृदगंध वातावरणात पसरविणारा आणि धरतीला सजविणारा हा अवखळ श्रावण येतो. हिरवागर्द, आल्हाद सृष्टीच्या चराचरात भरून राहतो. हा निसर्गोत्सव सर्वांसाठीच खुला असतो. स्त्रियांची आनंदाने ओंथंबलेली मने त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने तयार झालेली असतात. 'श्रावण आला ग वनी, श्रावण आला' हे गीत ओठांवर आल्याशिवाय रहात नाही. तर 'श्रावणमासी, हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे' असे म्हणणारे कवी बालकवी निसर्गाबरोबर पशुपक्षी व स्त्रियांचेही मोहक वर्णन करतात. धरतीवर सगळीकडे हिरवळ पसरलेली असते नि उनपावसाचा खेळही सुरू असतो. हिरवा शालू प्यायलेली धरती पाहून स्त्रियांचे स्वप्नाळू मन संस्कृतीचे पैलू उलगडू लागतात. वसुंधरेबरोबर ती देखील फुलांच्या गजरयाने नटते. दाराबाहेरील रांगोळी मन वेधून घेते.

प्रत्येक श्रावणी सोमवार म्हणजे एक पवित्र दिवस. तन व मनाने पवित्र होऊन आणि उपवास धरून शिवपूजन केले जाते. काही स्त्रिया महिनाभर उपवास धरून रोज एकवेळच जेवतात.


श्रावण पावसाचा, सणांचा नि गाण्यांचा,
श्रावणात घननिळा बरसला,
रिमझिम रेशीम धारा,
उलगडला झाडातून अवचित,
हिरवा मोरपिसारा
असा फुलाफुलांतून फुलणारा नि इंद्रधनुष्याला घेऊन येणारा श्रावण.

मंगळागौर माहेरवाशीणीचे मनही रमविते व भारतीय संस्कृतीचे विलोभनीय दर्शनही घडविते. 'नाच ग घुमा'च्या गाण्याने सुरूवात होते. झिम्मा, फुगडया आणि पिंगा घालत स्त्रिया व मुली रात्रभर मनसोक्त गातात व नाचतातही.


पाट बाई पाट, चंदनाचा पाट
पतीदेव बघतात माडीवर वाट

श्रावणातली अशी सर्वच गाणी अर्थसूचक आणि धरतीबरोबर मनालाही चिंब करणारी, आनंदाची पालवी फुटवणारी असतात.

श्रावणशुध्द पंचमीला येणारया नागपंचमीला मुली मेंदी काढून तयार असतात. 'चल ग सये, वारूळाला, वारूळाला गं' हे पारंपारिक गाणं कोणाला माहित नाही? वारूळाची पूजा करून नागोबाला दूध व लाहयांचा नैवेद्य देतात. मनसोक्त झोके खेळून तन व मन खुलून सौरव्याची झलक चमकते.

नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. पावसाळयाने ऊफाळणारया समुद्रामुळे कोळीराजा होडी समुद्रात नेत नाही. नारळीपौर्णिमेला कोळी समुद्राला नारळ वाहून व पूजा करून होडी पाण्यात सोडतो व व्यवसाय सुरू करतो. रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या निर्मळ प्रेमाचा सण. बहिण भावाला राखी बांधते ते औक्षण करूनच. हा राखीचा धागा अतूट बंधन निर्माण करतो. भाऊही तिला प्रेमाने छानशी भेट देतो.

श्रावण कृष्णातील श्रीकृष्णजंयती व गोकूळाष्टमी बालगोपालांचीच जणू असते. मोठमोठया चौकातील दहीहंडया 'गोविंदा आला'च्या जल्लोशात मुलांकडून फोडल्या जातात. एकीच्या भावनेने सर्वजण एकत्र येतात.

अमावस्येला येतो शेतकरी राजाचा पोळा. 'सारया जगासाठी खपे, पाय चिखलात रूते' अशा कष्ट करणारया बैलांना सजवून संध्याकाळी मिरवणूक काढतात. स्त्रिया बैलांची मनोभावे पूजा करून मऊसूत पुरणपोळीचा नैवेद्य देतात. प्राण्यांवरील प्रेमाचा हा उत्कट साक्षात्कार.

श्रावणतील शुक्रवाराचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. ह्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावतात. त्यांची ओटी भरून नमस्कार करतात. लहान मुलांना जेवायला बोलावतात. त्यांचे औक्षण करून ह्या दिवसाचा जणू मानच त्यांना दिला जातो.

असा हा मनाला भावणारा श्रावणमास केव्हा येतो नि केव्हा संपतो समजतही नाही. निसर्गराजाच्या अनोख्या साथीबरोबर सणावारांमुळे सर्वजण एकत्र येतात आणि आचाराबरोबर विचारांचेही आदान-प्रदान होते.

अलका दराडे
नाशिक

 

इतर लेख