सृष्टीरंग मुख्यपान

पारिजातक

‘सुवर्णचंपक फुलला विपिनीं रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघता भामा मनीचा मावळला…’

परिजातचे हे वर्णन त्याच्या गुणांना साजेसे आहे. पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळण-या पांढ-याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा प्राजक्त म्हणुनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतुर कडांची पानेही खरखरीत असतात. या पानांचा उपयोग प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी केला जात असे. याची फुलं म्हणजे सौंदर्य आणि सुगंध याचा उत्तम मिलाफ आहे. ही फुलं पांढ-या पाकळ्याची आणि देठ केशरी रंगाचे असतात. अत्यंत नाजुक असे हे फुल हातात घेतली तर लगेच सुकते. ही फुल खरे तर हाताळायची नसतातच, हलकेच टिपून घेउन परडीत ठेवायची असतात.

parijatakया फुलाच्या देठांपान सोनकेशरी रंग तयार करता येतो. त्याचा वापर रेशीम, कापड, लोकर इ. रंगवण्यासाठी तसेच खाद्यरंग म्हणूनही करता येतो. चातुर्मासात लक्ष फुले वाहण्याचा संकल्प करणा-या भाविकांना ही फुले प्रिय वाटतात. कारण पावसाळ्यात भरभरून फुलणारी असल्याने ही फुले सहज उपलब्ध होतात. रात्री या फुलांचा सडा वृक्षाच्या भोवती पडलेला असतो आणि त्याचा सुगंधही दरवळतो त्यामुळे प्रसन्न वाटते असा गुण यात आहे.

पारिजातकाची कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, देखण्या सूर्यावर मोहित झालेल्या एका सुंदर, स्वप्नाळू राजकन्येवरून सुर्याचे मन उडतं आणि तिला अव्हेरून तो दुस-या मुलीकडे निघून जातो. या अपमानाने निराश झालेली राजकन्या देहत्याग करते. तिच्या चितेच्या राखेतून रोपट्याच्या रूपने ती पुन्हा जन्म घेते, आणि तिचे वृक्षात रुपांतर होते. मात्र तिचा सूर्यावरचा राग गेलेला नाही त्यामुळे ती रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्या अश्रूंचा पुषरूप सडा जमिनीवर शिंपते.

‘आज अचानक असे जाहले
सांजही भासे मला सकाळ
प्राजक्ताच्या आसवंत सखि
सवें मौक्तिकें आणि प्रवाळ !’
कवी बा.भ.बोरकरांनी ह्या फुलांचे समर्पक वर्णन केले आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा