सुंदर माझे घर

Sundar Ghar बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात ‘टिप…टिप..’ आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले ‘माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. ‘ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. ‘शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!’ मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, ‘कोण आहे?’ पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. ‘अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?’ बिट्टीने विचारले. ‘तर काय! हेच माझे घर!’ पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली.

वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. ‘बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?’ बिट्टीने विचारले. ‘छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!’. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. ‘माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.’ बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती.

‘हो! हे बाकी खरेच!’ बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला.

समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली.

‘गार गार वारा अन् पावसाच्या धारा,
भिजलेली राने अन् पानोपानी गाणे,
झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी,
फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी,
ओल्या मातीत सुगंधाची भर,
सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! ‘

– विनया साठे

निळूचा नाच (जोडाक्षर विरहीत कथा)

‘मिआव मिआव’ निळूने जोरात हाक मारली. नदीपलिकडील झाडीतून आवाज आला ‘मिआव मिआव!’ मग निळूने पंख पसरून कसेबसे उडत पलिकडील तीर गाठले. काठावर बसून थोडावेळ विसावा घेतला. नदीत वाकून पाणी पिता पिता आपला सुंदर पिसारा पाहून तो खूष झाला. निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी. कुणीतरी रंगांची जणूकाही उधळणच केली होती. मग डौलदार पावले टाकत तो गवतातून पुढे निघाला. वाटेत बिळांतून डोके वर काढत ससू बोलला, ‘वा निळू! आज खूप खूप छान दिसतोस हं तू! किती लांबलचक सुरेख पिसारा आहे रे तुझा!’ हे ऐकून निळूला खूप बरे वाटले. आणखी थोडा वेळ पुढे जातो न जातो तोच पिलू हरीण भेटले. एक उंचच उंच उडी घेऊन ते निळूपुढे येऊन उभे राहिले. दचकून निळू दोन पावले मागे सरकला.

‘अरे निळू ! आज मी तुला ओळखलेच नाही. किती सुंदर पिसारा आहे रे तुझा. जरा फुलवून दाखवतोस कां?’

निळूने हळूच पिसारा हलवून बघितला पण तो गोलाकार कसा करायचा हेच मुळी त्याला कळेना. मग लगबगीने पुढे जात निळू बोलला, ‘उद्या दाखवीन हं तुला छानसा पंखा करून!’

आता हिरवळ संपून झाडेच झाडे दिसू लागली. वर पक्षांचा किलबिलाट चालला होता. एक राघूंचा थवा आरामात फळे खात होता. निळूकडे लक्ष जाताच सगळीजण कौतुक करू लागली. ‘काय सुंदर रंगीबेरंगी पिसारा आहे नाही निळूचा’ एकजण बोलला, ‘निळू जरा थुई थुई नाचून दाखव ना!’ निळूने परत एकदा पिसे हालवून बघितली. पण एक पीस जागचे हलेल तर शपथ! इकडे पोपटांचा थवा कलकलत उडाला. अहा रे गंमत! एका पक्षाला मुळी नाचताच येत नाही.’

मग निळू पटकन एका फांदीवर चढून बसला. काय केले असता सुंदर नाचता येईल बरे?….

तो मनाशी विचार करू लागला. हळूच एक एक पाऊल उचलून तुरा हलवत तो इकडे तिकडे डुलला. पण अजूनही मनासारखा नाच काही जमेना. मग निळूला भारी वाईट वाटले. कितीतरी वेळ तो उदास बसून राहिला. हा पिसारा नसता तरी बरे झाले असते असाही विचार मनात डोकावला. खूप खूप वेळ तो तसाच बसून होता. अन एकाएकी आभाळ चहूबाजूंनी भरून आले. काळे काळे ढग गडगडाट करू लागले. वीजही चमकू लागली. वारा झाडांना गदगदा हालवू लागला. चिमुकले थेंब पडायला सुरुवात झाली. एकामागून एक पडणारे ते थेंब पाहून निळू आनंदला. एका उडीतच तो झाडावरून खाली उतरला. थंडगार हवा, झिरमिरणारा पाऊस, दरवळणारा मातीचा सुगंध ! एका क्षणात निळूने आपली सगळी पिसे भरकन उघडली. सुंदर पंखा तयार केला. अन काय मजा, मान उंच करून तुरा हालवत व एकएक पाऊल उचलत निळूने बहारदार नाच सुरू केला.

झाडावरील पोपट, झुडुपातले पिलू हरीण, बिळातला ससू चकित होऊन बघत आहेत, इकडे निळूचे कुठे लक्ष होते?

– विनया साठे

← आजीच्या गोष्टी मुख्यपान