एक टक्क्याची गोष्ट


‘स्वयं शिक्षण’

‘रघुनाथाची बखर’ ही श्री. ज. जोशींची रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावरची एक वेधक कादंबरी. धोंडो केशव कर्वे ऊर्फ महर्षी कर्वे हा एक उपेक्षित बुध्दिमान गणिती प्राध्यापक. स्वत:चे जीवन प्रयोजन म्हणून जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे धरत तत्कालीन मराठी समाजाच्या दगडावर डोकं आपटत होते. त्यांची आठवण मला येत होती. समोर एक मध्यमवयीन सदगृहस्थ बसले होते.मी प्रश्नार्थक नजरेनं बघितले.
”बहिणीला जाम टेन्शन होतं हो…..लग्ना नंतरच्या पहिल्या रात्रीच”
”मग?”
”गावात पोर्नोग्राफीची सीडी शंभर रूपयात विकत मिळते आणली व गुपचूप दाखवून टाकली आमच्या सौ. ने तिला.”
मी अचानक अबोल झालो. तेच पुढे म्हणाले,”आमचीच एक मावस बहिण लग्नानंतर महिन्यात माहेरी परतली कायमची, नव-याच्या जबरदस्तीन. म्हटल आपण शहाणं व्हावं” मला काही कळलं नाही हे त्यांना समजलं. ते समजावत म्हणाले,”त्याचं काय झालं डॉक्टर, हल्ली जवळपास शंभर टक्के तरूण पोरं पोर्नोग्राफीच्या सीडी बघतात. अन काहीचं डोकं सटकतं, मग लग्न झाल्यावर त्यांच्या नवीन कोवळया बायकांकडून ही तरूण पोरं काय वाटेल त्या मागण्या करतात हो.पोरी नासमज असतात भेदरून जातात.” ते निघून गेले. मी रघूनाथ कर्वेचा विचार करत राहिलो.

अहं, आपल्या शाळांमध्ये लैगिक शिक्षणाची सोय नाही. अभ्यासक्रमच नाही.
पुण्यात एका शाळेत या विषयाची तोंड ओळख मुला – मुलींना द्यायला गेलो होतो. हळू हळू कठं फुटला.
खूप काही प्रश्न होते. खूप! ऐकले असते तर पालकांना चक्कर आली असती. ही आपली मुलं- मुली. त्यांना आपण लैंगिक शिक्षण दिलं नाही तर ते द्यायला आता जागोजागी सायबर कॅफे आहेत. पोर्नोग्राफीच्या सीडी आहेत.
पण तरीही अंधार मिट्ट आहे. आजही. रघूनाथाची बखर लिहीली गेली तेव्हा तो मिट्टच होता.
कोंबडा झाकल्यानं सुर्य उगवायचा थांबत नसतो. लैगिक शिक्षणाबद्दल एकाकी गुप्तता. दुसरीकडे एसटीवर पाटया,
”यौवन जब जब, निरोध (कंडोम) तब तब”
नवरात्रानंतर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गर्भपाताच्या केसेस, त्याही तरूण अविवाहित मुलींच्या वाढतात. आपल्या घरातील तरूण वा शालेय मुलं ही सायबर कॅफेत तासन तास पोर्नोग्राफीच्या सीडी बघतात. उच्चशिक्षित नवविवाहिता परीणामांची चिंता न करता कोणतंही संतति नियमनाचं साधन वापरत नाहीत व गर्भ राहीला की नोटा फेकून तो खडखडून काढतात.
तरीही आपण सुन्न….बधिर.

त्याकाळात रघुनाथ कर्वे दारिद्रयात सतत संघर्ष करत दगडावर डोकं आपटत राहिले.
आज अदृश्य असा एच.आय. व्ही. चा एक टक्का वावरत असतानाही आम्ही आमच्या मुला मुलींपुढे कोणता पर्याय ठेवतो आहे, लैगिक शिक्षणाचा? तर फक्त एकच. तो पर्याय आहे. स्वयंशिक्षणाचा. पण आपण एक गोष्ट विसरतोय. ‘अनुभव’ हा एक निर्दय शिक्षक असतो. तो आधी शिक्षा करतो व नंतर शिकवितो.

डॉ. अरूण गद्रे यांचे काही साहित्य
Dr Arun Gadre एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून ‘प्रयास,” पाथफाइंडर ‘ संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर ‘हितगुज लेकीशी’, ‘एक होता फेंगाडया’, ‘घातचक्र’, ‘विषाणू’ अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

Hitguj
Ghatchekra
Vadhstambha
Vishanu