उद्योजक - उद्योजकांच्या मुलाखती

कागदनिर्माता – मल्हार सदाशिव उर्फ बाबुरावजी पारखे

Baburao Parkhe मराठी मंडळीनी केलेल्या औद्योगिक पराक्रमात बाबुरावांनी केलेला विक्रम अप्रतिम आहे. कागद ज्यापासून तयार होतो. तो बांबूचा लगदा तयार करण्याची त्या काळाची साडेबारा कोटी भांडवल लागणारी प्रचंड योजना त्यांनी साकार केली. महाराष्ट्रात नाही तर, भारताच्याही औद्योगिक इतिहासात खासगी क्षेत्रात एवढा मोठा उपक्रम केल्याची उदाहरणे त्या काळी तुरळकच होती. लहानपणीच वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आई माईसाहेब यांनी केले. महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या मोहिमेमुळे बाबुरावांचे संस्कारक्षम मन देश प्रेमाने भरले होते. कागदाची खरेदी बाबुराव शेठ फार्दुनजी यांच्याकडून करत असत. त्यातूनच स्नेहभाव निर्माण झाला. आणि ते बाबुरावांचे व्यावसायिक गुरु झाले. पुढे पदवी मिळाल्यावर ठराविक नोकरीच्या चाकोरीतून न जाता त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनुभव घेण्यासाठी त्यांनी डेक्कन पेपर मिलमध्ये नोकरी केली. नंतर स्वत:च्या उद्योगावर लक्ष द्यायचे ठरवले. इचलकरंजी संस्थाकडून कर्ज शिष्यवृत्ती मिळून ते शिक्षणासाठी जपानला गेले. लहान व्यवसायातून प्रगती करून मोठे कसे होता येते. हे ते जपानला शिकले. तिथे आपल्या भावी वाढीची बोलणीही करून आले. पुढे त्यांनी खासगी व्यवसायांचे रुपांतर पेपर आणि पल्प कन्व्हर्शन लि. मध्ये केले.

पट्टा तयार करण्यासाठी लागणा-या यंत्रसामग्रीची निर्मितीही त्यांनी स्वत:च तयार केली. 16 जून 1947 पासून आपल्या दिवंगत भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ गो. स. पारखे पारितोषिकाची अपूर्व योजना त्यांनी राबवली. राम-लक्षमणा सारखे प्रेम या भावांचे होते. आपला कारखाना खोपोलीला काढून तेथे त्यांनी नवीन औद्योगिक वसाहतच निर्माण केली. पुढे युरोपचा दौरा करून व्यवसायवाढीला सुरुवात केली. बाबुराव छोट्या कागद गिरणीला लागणा-या यंत्रसामग्रीची निर्मितीही करू लागले. या कारखान्यात छपाई विभागही सुरु केला. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजमान्यता आणि लोकमान्यताही मिळवली. व्यावसायिक बाबी बरोबरच अध्यात्मिक बाजूही कौशल्याने सांभाळली होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे बाबुराव चालते बोलते प्रतिक होते. बाबुरावांचे जीवन हे निष्काम कर्मयोग्याचे जीवन आहे. शून्यातून सृष्टी निर्माण करणा-या तरुणांना स्फूर्तिदायक आहे.

शिक्षणक्षेत्रातील उद्योजक : विवेक सावंत

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे व एक अत्याधुनिक शिक्षणाची तात्रिंक क्रांती घडवून आणणारे बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यात विवेक सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजाला पूरक शिक्षणाचा उदय करून ते लोकाभिमुख बनविण्याचा विडा त्यांनी उचलला, तो उल्लेखनिय आहे. या लोककल्याणकारी भावनेमागे व सामाजिक विचारामागे निश्चितच खोलवर संस्कारांची पाळेमुळे दडलेली असतात. ही पाळेमुळे शोधण्यासाठी ज्या वेळेस साक्षात श्री. सांवताच्या मातोश्री सत्यशीला रामचंद्र सांवत व वडील रामचंद्र लक्ष्मण सांवत याचाशी संवाद झाला. ह्या प्रदीर्घ भेटीतून सांवत नावाचा तंत्रज्ञानी व समाजकारणी कसा आकरला गेला याचा उलगडा होत गेला…

८६ वर्षाचे वडील व ८३ वर्षाच्या मातोश्री ह्यांनी आपल्या घराण्याचा वारसा सांगितला. सेवा व शिक्षणव्रत हाच सावंतांचा पिढ्यानपिढ्या वारसा आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात १९४० मध्ये विवेक ह्यांचे आजोबा लक्ष्मण सावंत यांनी न्यू एज्युकेशनची स्थापना केली. ज्ञान, आरोग्य, शील हे या शिक्षणसंस्थेचे ब्रीद होते. त्या काळाचे न्यू एज्युकेशन म्हणजेच आजचे बिटको बॉइज हायस्कूल होय.

त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून १९६५ साली त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विवेक सावंत यांचे अकरावीर्यंत शिक्षण नासिकच्या न्यू एज्युकेशन मध्येच झाले. अकरावीपर्यंत इंटरपर्यंतची दोन वर्षे ते मुंबई होते. पुढील शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. लैकिक रूपाने ते विज्ञानाचे पदवीधर झाले खरे परंतु नाशिकच्या सामाजिक संपन्न असलेल्या वातावरणाचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम झालेला आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर अश्या थोरांचा सहवास लाभला आहे.

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा त्यांच्या व्यति-मत्वावर झालेला सकारात्मक परिणाम ते अंत्यत सहजतेने सांगतात. झाड ज्या जमिनीत फोफावते, तिथल्या मातीच्या फुलांना गंध यायला हवा अशी त्यांची ठाम धारणा आहे. त्यामुळे भाषाविषयक प्रश्न सोडविण्यासाठी ते आग्रह करतात आणि समाज तयार असेल तर तंत्रज्ञान समाजाला पाहिजे ते पुरवू शकते. याची ग्वाही ते देतात. आपण जर मराठीची खरोखर कास धरणार असू तर तंत्रज्ञानाचे लोक मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञातून सुलभ करण्यासाठी तयार होतील. त्यांच्या उद्योगजकतेच्या विकासाला व संशोधनशिलतेला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.