उद्योजक - उद्योजकांच्या मुलाखती

बिझनेस महाराजा

Jaishankar व्यवसायाच्या यशात व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे व्यवस्थापकीय अधिका-यांची जबाबदारी सगळ्यात मोठी.

व्यवस्थापकीय क्षेत्रातील गुरू मानले जाणा-या लोकांना धोरण, निर्णय याबद्दल बोलायला आवडतं हे खरं परंतु बरेचवेळा व्यवस्थापनाचे निर्णय हे प्रत्यक्षात अधिका-यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेले असतात. असे वेगळे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून राहणारे व्यवस्थापन गुरू जयशंकर ह्यांचे नाव घ्यावे लागेल. जय म्हणून ओळखले जाणारे जयशंकर बहूराष्ट्रीय कंपन्यांसाठी ‘बिझनेस महाराजा’ म्हणूनही ओळखले जातात. अवघ्या ४१व्या वर्षी ‘पर्किन एल्मर’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदाची जय यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. अब्जावधी रूपयांचं उत्पन्न असलेली पर्किन एल्मर १२५ देशांमध्ये कार्यरत आहे.

जयशंकर यांनी ”बिट्स पिलानी” मधून अभियंतेची पदवी मिळवून कोलकत्ता आयआयएम येथून एमबीएची व्यवस्थापकीय पदवी घेतली आहे. त्यांनी ‘हिंदूस्थान लिव्हर’मधून आपल्या करिअरचा प्रवास सुरू केला. लिव्हरमधील अन्न-तंत्रज्ञान विभागात १३ वर्षांच्या अनुभवानंतर ‘ग्लॅक्सो’ कंपनीच्या माध्यमातून औषधी कंपन्यांच्या जगामध्ये प्रवेश केला. जय ‘नोवार्टिस’ या कंपनीमध्ये जागतिक कार्यवाही विभागाचे अध्यक्षही होते. सेल्स, मार्केटींग, संशोधन विभाग, सप्लायचेन अशा विविध विभागांमध्ये काम करून जय यांचे अनुभव विश्व अधिक समृध्द झाले. प्रचंड ऊर्जा, दूरदृष्टी असलेला सृजनशील नेता मिळाल्यामुळे पर्किन एल्मरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचाच जय यांचा खाक्या असतो. आज ते त्यांच्या कंपनीला भारतातील ‘आरोग्य विज्ञान’ क्षेत्रात प्राथमिक स्थान मिळवून देण्यासाठी फक्त नेतृत्व करत नाहीत तर भारतातील तमाम जनतेची आरोग्यशैली उत्तम होण्यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहेत.

जय यांच्या दूरदृष्टीने प्रत्येक दिवस नवीन संधीची दालनं उघडून देणारा आणि आव्हानपूर्ण असतो. ‘बिझनेसच्या प्रत्येक पैलूमध्ये सृजनशीलता आणि नवीन कल्पनांचं स्वागत करणं’ हेच जय यांच बिझनेस तत्वज्ञान आहे. त्यांच्यामते कोणत्याही कठीण आव्हानावर कठोरपणे वस्तूनिष्ठ पध्दतीने चिकित्सा करुन तसेच सकारात्मक दृष्टीकोनातून मात करता येते. कंपनीमधील कर्मचारी ही त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी ताकद आहे. जय म्हणतात, ”कर्मचा-यांना तुम्ही सशक्त दृष्टीकोन असलेल्या, उत्तम ब्राण्ड आणि उच्च मूल्य जपणा-या कंपनीमध्ये काम करत आहात याची जाणिव करून देणं गरजेचं असतं आणि आम्ही ती करून देतो.” जर ते या गोष्टींना बांधील राहिले, तर कामाला पोषक असं उत्साही वातावरण निर्माण होऊन कंपनीची उत्पादन क्षमता वाढते.

तुम्ही तुमच्या सहका-यांना प्रेरणा कशी देता असा प्रश्न विचारला असताना जयशंकर म्हणतात, ”जर तुम्ही नम्र असलात तर कोणालाही तुमच्याकडे यायला दडपण वाटणार नाही. अध्यक्षाच्या खूर्चीमध्ये न बसता ऑफिसमधील सहका-यांच्या बरोबरीने त्यांच्या कृतीमध्ये सामील होणं अतिशय महत्वाचं आहे. स्वप्न बघणं, त्यासाठी स्वत:ला सारखं प्रेरणा देणं महत्त्वाचं आहे. कंपनी प्रमुखाने स्वत:साठी आणि कंपनीसाठी पात्रतेची पातळी ठरवणं गरजेचं आहे. ती स्पष्ट असली की योग्य दिशा मिळते. सरते शेवटी आदर मागून मिळत नाही तर कमवावा लागतो.”

जयशंकर हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, गुजराथी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, या भाषा अस्खलित बोलतात. मराठी वाचता येतं पण शुध्द आणि अस्खलित बोलता येत नाही, बोललेलं समजतं! त्यामुळे सहका-यांशी संवाद साधणं शक्य होतं. जय हे उत्तम खेळाडूसुध्दा आहेत. शाळा-कॉलेजमध्ये असतांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट खेळलेले आहेत. फुटबॉल अजूनही खेळतात. मुंबईच्या पीडीपी मैदानावर त्यांनी ‘सॉकर-क्लब’ स्थापन केला आहे. १९९८ साली रगबी खेळतांना डाव्या पायाच्या हाडाजवळचा भाग तुटला होता. डॉ. श्रीनिवास यांनी त्यांना चालता येणं शक्य नसल्याचं सांगितलं. भौत्तिकोपचार तज्ज्ञाकडून सहा महिने त्यांनी व्यायाम करवून घेतला. त्यावेळी त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवून ऑफिसला न्यावं लागतं होतं. मुंबई मॅरेथॉनला धावण्याच्या महत्त्वकांक्षेपायी त्यांनी चालायला आणि नंतर धावायला सुरुवात केली.

गेली चार वर्ष जयशंकर मुंबई मॅरेथॉन धावत आहेत. त्यांच्यामते मॅरेथॉन धावतांना आपल्याला ऑलिम्पिक धावपटू बरोबर स्पर्धा करायची नसून ती स्पर्धा स्वतःशीच असते. त्यासाठी नियोजन करणं आणि नियोजन कार्यवाहीत आणणं ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.

जयशंकर यांना मदर तेरेसा प्रेरणादायी वाटतात. गरजूंना मदत करणे आणि लोकांशी संवाद साधून अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यातून जय समाजाशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करतात. जय यांची पत्नी अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांना सहा आणि अकरा वर्षाचे दोन मुलगे आहेत. कुटूंबापासून प्रचंड आनंद आणि उर्जा मिळते असं जय अगदी आवर्जून सांगतात.

नवीन तंत्रज्ञानाची जाण, खिलाडूवृत्ती, कुटूंब आणि ऑफिसमधील कर्मचा-यांशी मुक्तपणे संवाद साधणारे जयशंकर एका यशस्वी व्यवस्थापकाशिवाय अत्यंत उमदा माणूस म्हणून ओळखले जातात ह्यात नवल ते काय.

पूर्णिमा पारखी – मुंबई