उंदराची टोपी

Undirachi Topi एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा, धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा, शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक!’ राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला ‘जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’

शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’

हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

– विनया साठे

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.

अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

– विनया साठे

बुड बुड घागरी

Bud Bud Ghagari तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणतो दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’

मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

– विनया साठे

मातृभक्त लक्ष्मणदेव

एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.

एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.

एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. ‘लक्ष्मणा थोडे पाणी देतोस’ लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली ‘लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?

लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, ‘आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं’.

तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते.

– विनया साठे

← आजीच्या गोष्टी मुख्यपान