सेवासुविधा

टपाल पत्रमुद्रासंग्राहकता

Philatelyदिवसाकाठच्या किंवा आठवडा महिन्यातील मिळणा-या रिकाम्या वेळात एखादा चांगला छंद जोपासण्याची सवय लावून घेतल्यास (विशेषकरुन विद्यार्थीदशेतच) पुढील आयुष्यातील रिकाम्या वेळात त्याचा चांगला उपयोग होतो हे एक जगदसत्य आपे. गायन-वादन नर्तन,चित्रकला,शिल्पकला-छायाचित्रकला असे काही कलात्मक छंद तर विविध वस्तूसंग्रहासारखे संग्रहात्मक छंद उत्तम होत. हे छंद जोपासतांना आलेले अनुभव,त्यावेळच्या आठवणी यांचा पुढील आयुष्यांत निश्चित चांगला उपयोग होतो. पोष्टाची तिकीटे जमविण्याचा छंद (इंग्लीश शब्द ‘फिलाटेली’) हा संग्राहक छंदाचा ‘राजा’ मानला जातो. एकेकाळी राजेलोक अथवा तत्सम व्यक्तीही हा छंद जोपासत. म्हणून याला ‘छंदाचा राजा आणि राजांचा छंद’ असेही म्हटले जाते. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज,महाराणी एलीझाबेथ, अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट, मिस्त्र देशाचे शाह फाऊद, त्यांचा पुत्र शहा फरुख, ऑस्ट्रेलियातील काउंट फिलिप फेरेरी,स्वीडनचे कर्नल हन्सलगर फोक,रशियातील एगर्थन फेबर्ज अशी कांही विदेशी व्यक्तींची नावें या संदर्भात घेतली जातात.

तिकीट वेडे, तिकीट वेडयांचा आग्रणी, तिकीटांचा बादशहा, तिकीटांचे तज्ञ, महान संग्राहक अशी विशेषणें या व्यक्तींच्या मागे मोठया आदराने लावली जातात. फिलाटेली हा शब्द इंग्लिश शब्द फिलॉस(अर्थ-आवड,प्रेम) आणि ऍटेलिया(अर्थ-तिकीटे जमविणे.) या दोन ग्रिक शब्दापासून बनलेले आहेत. युनियन पोस्टेल युनिव्हर्सली (यु.पी.यु.) या आंतर्देशिय संस्थेचे कार्यालय स्वित्झरलँडमधील बर्न येथे सन् 1874 मधे स्थापण्यात आले. पोष्टाच्या सुधारणा, त्यांच्या व्यवहाराच्या व्यवस्थापनातील जोडणी ठेवून, त्या संदर्भातील नीतीनियमांच्या पालनाकडे लक्ष ठेवण्याचे काम संस्था करते. टपाल तिकीटसंग्रहाच्या विषयाबाबतीत सर्वोच्य अधिकार असलेली ‘फेडरेशन इंटरनॅशनेल डी फिलाटेली (एफ.आय.पी.)’ ही आंतर्देशिय संस्था 18जून 1926ला स्वित्झरलँडमधील झुरिच येथे स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या मोठया मानाच्या अध्यक्षपदावर भारताचे तिकीट संग्राहक श्रीयुत डी. एन. जतीय यांची 1992 मधे निवड झाली होती. तसेच श्रेष्ठ तिकीट संग्रहकांच्या नामावलीत नाव समाविष्ट झाले आहे असे ते पहिले भारतीय तिकीट संग्राहक आहेत.

कै.श्री. चुन्नीलाल देसाई, कै.श्री. जगतापसिंह डूगर, कै.श्री. बहादूरसींध सिंधी, कै.श्री. जालकपूर ही आणखी काही प्रसिध्द भारतीय तिकीटसंग्राहकांची नावें घेतली जातात. ज्ञानवर्धन आणि मित्रवर्धन असे दोन प्रमुख लाभ फिलाटेली छंदाचे मानले जातात. दुर्मिळ किंवा एखाद दुसरी चूक असलेले टपालतिकीट कोणाला मिळाल्यास होऊ शकणारा आर्थिक लाभ तुलनेने मोठा असला तरी फारच क्वचित संभवाचा असतो. टपालतिकीट संग्रहाच्या छंदामुळे भूगोल विषयाची आवड निर्माण होते असे इंग्लंडमधील शिक्षकांचे आवर्जून सांगणे होते. सध्या अस्तित्वात असलेल्या गोंद लावलेल्या टपाल तिकीटांची कल्पना सर रोल ड हिल यांनी मांडली आणि इंग्लंडच्या महाराणीला पसंत पडली. तिच्या आज्ञेवरुनच जगातील पहिले टपाल तिकीट (पेनी ब्लॅक नावाने प्रसिध्द असलेले) 6मे 1840 ला इंग्लंडला प्रसारित करण्यात आले. इंग्लंडच्या आधिपत्याखालील हिंदुस्थानांत सर्वत्र वापरासाठीचे पहिलेटपाल तिकीट सन 1854 मधे प्रसारित करण्यात आले.

भारतीय टपाल सेवेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृत्त्यर्थ भारतीय टपालखाते हे 2005 वर्ष समारंभपूर्वक साजरे करत आहे. याच 2005 सालात मराठीवर्ल्डडॉटकॉम या साईटवर ‘फिलाटेली’ हा विषय नमूद केला जाणे हा उत्तम योगायोगच आहे.

रसिकहो, आपल्याकडेही अशी दुर्मिळ तिकिटे असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा. आम्ही त्यास योग्य प्रसिध्दी देऊ. ई मेल – mweditor@marathiworld.com