खेळाडू


भारतीय महिला क्रिकेट संघातील गोलंदाज सौ. दीपा मराठे यांची मुलाखत

Deepa Marathe क्रिकेट! पुरुषांचे वर्चस्व असणारा लोकप्रिय खेळ. परंतु २००४ मध्ये भारतीय महिलासंघाने साऊथ अफ्रिकेत विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या संघातली गोलंदाज सौ. दीपा मंगेश मराठे ह्या मराठी खेळाडूची मराठीवर्ल्डतर्फे मंदार माईणकर यांनी घेतलेली दिलखूलास मुलाखत..

दीपा, आपण क्रिकेटकडे कशा वळलात?
मी पूर्वाश्रमीची दीपा मधुकर कुलकर्णी. माझा जन्म मुलुंडला झाला. पहिली ते चौथी मी लोकमान्य प्राथमिक सौ. दीपा मराठेविद्यालय व माध्यमिक शिक्षण वामनराव मोरांजन माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. आमच्या सोसायटीत मी लहानपणापासून माझ्या भावांबरोबर तसेच सोसायटीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळले. तेव्हा अगदी लहानपणापासून या खेळाची आवड लागली.

एकदा आमच्या शेजारी एक मुलगी पांढरा शर्ट आणि पँट घालून आलेली मी पाहिली. आमच्या शेजारच्या मुलीची ती मैत्रीण होती. मला प्रश्न पडला की ती कुठला खेळ खेळत असेल? ‘तिला’ विचारल्यावर महिला क्रिकेटची माहिती मिळाली. तिनेच मला सुरेखा भंडारे यांचा पत्ता दिला. त्या माटुंग्याला नवयुग क्रिकेट मंडळ चालवायच्या व महिलांसाठी क्रिकेट प्रशिक्षणही द्यायच्या. पण तो क्लब माटुंग्यांला होता. मग मी वडिलांची परवानगी मागितली. वडिलांचा सुरुवातीला एवढा पाठिंबा नव्हता. पण माझी एक इच्छा म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. तेव्हा माझी दहावी नुकतीच झाली होती. १९८८ साली नवयुग क्रिकेट मंडळात जाऊ लागले. सुरुवातीचे ७-८ दिवस वडील मला पोहचवायला व न्यायला येत. तिथे त्यांनी माझा खेळ पाहिला व त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटायला लागला.

मग तू तुझ्या आयुष्यातला पहिला हंगामी क्रिकेट सामना कुठे खेळलीस?
लखनौला एक आमंत्रितांची स्पर्धा होती. त्यात मुंबईच्या आमच्या संघाला खेळण्याची संधी दिली. त्या स्पर्धेत माझी गोलंदाजी चांगली झाली. सौ. सुरेखा भंडारेंनी मग माझ्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलीत गुण आहेत. तिला हा खेळ सोडायला सांगू नका. मलाही मी क्रिकेटमध्ये करियर करू शकेन असा विश्वास वाटायला लागला. माझी मुंबईच्या सिनियर संघात निवड झाली होतीच पण गोलंदाज म्हणून!

मग पुढचा प्रवास तु कसा केलास? पुढचं शिक्षण आणि तुझं क्रिकेट यात समन्वय कसा साधलास?
Deepa Marathe मला लहाणपणापासून चित्रकलेची आवड. दहावीनंतरच एका कोर्स साठी मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस या महाविद्यालयात आवेदनपत्र भरले परंतू मला त्या वर्षी प्रवेश मिळाला नाही. मग मी चर्नीरोडला एक फाऊंडेशनचा कोर्स केला. त्या दरम्यान मला अभ्यास महत्त्वाचा वाटला. कारण मला जे. जे. ला प्रवेश मिळायचा होता. मी तर त्या वर्षी क्रिकेट संपूर्णच बंद केले होते. त्याच दरम्यान मला सुरेखा भंडारे ह्यांचा फोन आला. पण त्यांना मी माझी अडचण समजावून सांगितली. पुढल्या वर्षी मी जे. जे. ला टायपोग्राफीच्या कोर्सला प्रवेश घेतला. जे. जे. ची महिला क्रिकेट टीम होती. मग मी या संघात दाखल झाले व सरावही करू लागले होते. आता अभ्यास व खेळ यामधली तारेवरची कसरत संभाळता संभाळता मला आपण या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकू याचा आत्मविश्वासही येऊ लागला होता. मग मी युनिव्हर्सिटीही खेळले. या दरम्यान माझा सरावही जवळजवळ रोजच चालू होता.

रणजी क्रिकेटसारख्या महिलांच्या स्पर्धा कधी खेळलीस?
अशा कुठल्या स्पर्धा महिलांसाठी असतात. त्याबद्दल काही सांगशिल का?
रणजी स्पर्धेसारखे महिलांचे वेळापत्रक नसते. आमच्या वर्षभरात राणी झाशी, इंटर झोनल, इंदिरा प्रियदर्शिनी व सिनीयर नॅशनल्स अशा तीन महत्त्वाच्या स्पर्धा होतात. इंडिया प्रियदर्शनी स्पर्धेत चार विभागाचे संघ व इंडियन एअरलाईन्स तसेच एअर इंडिया हे संघ खेळतात. सिनियर नॅशनल्स मध्ये देशभराचे संघ खेळतात. मी त्या सर्व स्पर्धा खेळले.

राष्ट्रीय संघात कसा प्रवेश मिळलास?
१९९० ते १९९५ मी मुंबईसाठी खेळले तसेच मुंबई विद्यापिठाच्या संघाचेही नेतृत्व केले होते. मला मग १९९५ मध्ये एअर इंडियातर्फे करारबध्द होण्यासाठी मागणी आली. १९९५ ते १९९६ सालच्या महिला क्रिकेटच्या सर्व स्पर्धा एअर इंडियाच्या म्हणजेच आमच्या संघाने जिंकल्या. माझा खेळ या स्पर्धेदरम्यान अतिशय उत्कृष्ट झाला. मग याच्याच जोरावर १९९६ साली भारतीय संघात माझी निवड झाली.

तुझी १९९६ साली भारतीय संघात निवड झाली ते वर्ष तर महिलांच्या विश्वचषकाचे वर्ष होते. मग त्यात तुझी आणि भारतीय संघाची कामगिरी कशी झाली?
आम्ही तो चषक काही जिंकू शकलो नाही परंतू एक संघ म्हणून आमची कामगिरी बरी झाली. आम्हाला आमच्या क्षमतांचा अंदाज आला. आपल्यातले कच्चे धागे शोधता आले. प्रतिस्पर्धी संघाची बलस्ताने व त्याच्यांतल्या उणिवा यांचा चांगला अभ्यास करता आला. सारासार विचार करता आमच्या असे लक्षात आले की खेळाचे कौशल्य आमच्याकडे नक्कीच होते. आम्हाला आमची शारिरीक क्षमता वाढवावी लागणार होती.

“Our skills were better but we need to concentrate on physical fitness.”

जवळ जवळ १० वर्षांपेक्षा सुध्दा जास्त तू आज क्रिकेट खेळली आहेस. १९९० ते २००० हा काळ इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या उदयाचा होता तेव्हा विविध चॅनल्स, बातम्या यामुळे महिला क्रिकेट लोकांना माहित झाले असं तुला वाटतं का?
नाही. महिला क्रिकेटला म्हणावी तेवढी प्रसिध्दी वृत्तपत्रे तसेच चॅनल्स यांनी दिली नाही. अर्थात आम्ही यावर्षीच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचल्याने मिडियाचा आमच्या संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

मिडियाने पाहिजे तेवढी मदत केली नसेल तरीही आमच्या संघटनेने त्यासाठी खूप प्रयत्न केले. यंदाच्या विश्वचषकात खेळण्यासाठी आम्हाला तर पुरस्कर्तेही मिळत नव्हते. अगदी दोन दिवस बाकी असतांना सहाराने आम्हाला पुरस्कृत केले याबाबत आम्हाला त्यांचे आभार मानायला हवेत.

तुमच्या संघटनेला मग तशी कोणाची मदत झाली.? मध्यंतरीच्या कालात तुमची संघटना आणि B.C.C.I या दोन्ही संघटना एक होणार आहेत याची चर्चा होती. त्याबद्दल थोडे सांगशिल.
महिलांच्या संघटनेला तर पुरस्कर्ते मिळवण्यासाठी कष्ट पडतातच. आमच्या संघटनेच्या अध्यक्ष सौ. शुभांगी कुलकर्णी ह्या या कामात आम्हाला मदत करतात. आम्ही आमच्या संघासाठी संघटनेमार्फत जाहिरातदारही मिळवतो. मध्यंतरीच्या काळात विशेष मदतगार म्हणून मंदिरा बेदींचा खास उल्लेख करावाच लागेल. आमच्या संघटनेच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी व आमची संघटना आर्थिक दृष्टया सक्षम व्हावी म्हणून तिने आम्हाला खूप मदत केली आहे.

आमची संघटना आणि BCCI यांची बोलणी चालू आहेतच. आत्तापर्यत दोन ते तीन वेळेला भेटीगाठी झाल्या आहेत दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आता लवकरच निर्णय कळेल परंतू महिलांच्या संघटनेला या विलिनीकरणाचा नक्कीच फायदा होईल. आम्हाला ब-याच सोयीसुविधा मिळतील. इतर देशांमध्ये पुरूष व महिला खेळाडूंची क्रिकेट संघटना एकच आहे आणि आपल्या देशातही होईल याची मला आशा आहे.

वर्ल्डकप साठी कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली होती ?
या विश्वचषकाआधी आम्ही श्रीलंका, साऊथ अफ्रिका, वेस्टइंडिज विरूध्द मालिका जिंकल्या आहेत. सौ शुभांगी कुलकर्णी संघटनेवर आल्यापासून संघाच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आहे. विश्वचषकाआधी क्रिकेटच्या सरावाबरोबर आम्ही स्विमिंग, योगा, वेट ट्रेनिंग, जीम ट्रेनिंग, सायकॉलॉजीकल ऍस्पेक्ट ऑफ द गेम (क्रिडा मानसशास्त्र) या गोष्टींवर सुध्दा भर दिला. संघात एक योग्य समतोल आणण्यासाठी प्रयत्न केला होता.

तुम्हाला पुरुषांच्या भारतीय संघातले खेळाडू किंवा माजी खेळाडू मदत करतात का?
सध्या भारतीय संघात असलेल्या कोणत्याही खेळाडूचे आम्हाला प्रशिक्षण लाभले नाही. त्यांचे हंगामी व आमचे सामनेही ब-याचदा एकाचवेळी असतात. आता आम्ही विश्वचषक स्पर्धा खेळत असताना भारतीय संघ इथे आपल्याच देशात पाकिस्तानशी दोन हात करत होता. आम्ही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचलो तेव्हा भारतीय पुरूषसंघाचा कर्णधार सौरव गांगूलीने आम्हाला शुभेच्छा संदेश पाठवला- ‘आम्हाल जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा.’

माजी खेळाडूंमुळे आमच्या खेळात सुधारणा आणण्यासाठी मदत झाली. कपिलदेव, बिशनसिंग बेदी, मनिंदर सिंग या माजी खेळाडूंनी आम्हाला त्यांचे मौलिक मार्गदर्शन दिले आहे. पण माझ्या मते पुरुष व महिला संघटना एकत्र झाल्यावर मात्र महिला क्रिकेटर्सना चांगलाच फायदा होईल.

महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी अजून काय करावे असे तुम्हाला वाटते?
शाळा, कॉलेज स्तरावार महिलांचे क्रिकेट वाढायला हवे. त्याप्रमाणे शाळेत मुलांचा क्रिकेट संघ असतो तसा तो मुलींचाही हवा. माझ्या मते मुंबईत तसेच महाराष्ट्रात महिला क्रिकेटमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. पण त्या गुणवत्तेला पोषक असे वातावरण महिला क्रिकेटला नाही. आता मुंबईचेच घ्या मुंबईत फक्त सौ. सुरेखा भंडारे याच महिलांचा क्लब चालवतात. मुंबईत जिथे मुलांचे, पुरुषांचे क्लब चालतात तिथे महिलांसाठीही संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

लग्न झाल्यानंतरही क्रिकेट हा खेळ तसाच पुढे चालू ठेवतांना तुला काही अडचणी आल्यात का?
मला घरातून सासूबाई, नवरा यांचे संपूर्ण सहकार्य मिळते.
माझ्या अनुपस्थित सासूबाई घरची सर्व जबाबदारी सांभाळतात त्यामुळेच मला शारिरीक व्यायाम, खेळाचा सराव नियमित करता येतो तसेच खेळानिमित्ताने बाहेरगावी जाता येते.

मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर

मुलाखत व शब्दांकन – मंदार माईणकर