जटायूचे मंदिर : टाकेद


jatayuce-templeभारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी,पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते.तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पुजनही केले आहे.रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले आहे.सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातील एक प्रसिद्ध कथा समजली जाते.सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला.रावणाने त्याचे पंख कापुन टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली.प्रभु रामचंद्रानी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले.ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले.

रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली आहे ते स्थान म्हणजे नाशिक जिल्हाल्यामधील टाकेदतीर्थ हे आहे.येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला आहे.नाशिकवरून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४७ कि.मी आहे.जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले आहे. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण आहे. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रानी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे.त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात.

भुलेश्वर मंदिर, माळशिरस जि. पूणे

पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले भुलेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलत: हे ठिकाण ‘मंगलगड’ असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते.

मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते.

अशी आहे रचना
मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत.

मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो.

१७ व्या शतकात जीर्णोद्धार – यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे. १६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला मांडला. या किल्ल्याचा भग्न बुरूज देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी हे बांधकाम केले. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत. सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकडे होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार भुलेश्रर येथून होत होता.

पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.