नवरात्र उत्सव

navratra पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या शारदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याच मूळ नाव आहे ‘ईष’. ‘ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा ‘ईष’ म्हणजे अश्विन मास सुरू होतो. त्याच्या प्रारंभापासूनच सुरू होणा-या या नवरात्रोत्सवाच मूळ काय? हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी ‘दुर्गम’ नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा. त्याचा ‘दुर्ग’ म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचीच दुसरी नाव काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.

हा विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक सणात वर्षांवर्षांची आशी नवीच भर पडत गेलेली दिसेल.

दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरून शस्त्रे उतरवून विराटाच्यावतीने अरिजुनान कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.

आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहान देशभर साजरा होतो. दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा तो सर्वाधिक महत्वाचा सण आहे.

नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा पूर्ण प्रगत झाला. पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायडयाने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केल आहे.

नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. ही पहिली रात्र असते. या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवता राहणार असतो. (प्राचीन अखंड अग्निहोत्र व्रताचच हे बाळप्रतीक होय.) हा घटस्थापनेचा दिवस.

पुढे प्रत्येक दिवशी विपुल अशा झेंडूच्या किंवा तीळाच्या फुलांची एक एक चढत्याक्रमाची भरगच्च माळ या घटावर टांगली जाते. प्रत्येक दिवसानुसार तिला पहिली, दुसरी, तिसरी माळ म्हणतात. या काळात पाऊस पडलाच तर तो माळेत सापडला आता किमान नऊ दिवस तरी पूर्ण होईतोपर्यंत हटणार नाही. अशी बुजुर्ग चर्चा करतात. ती अनुभवसिध्द असते.

नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एकएका पाठाचे सविध पठन केले जाते. काही घराण्यात त्यांची म्हणून आदिमायेच रूप मानलेली कुलदेवी असते. तिच्या स्तुतीचे पाठ असलेल्या त्या त्या घराणांच्या पोथ्या असतात. त्यांचेही पठन या काळात केले जाते.

नवरात्राच्या नऊ दिवसात शेवटचे ८, ९ व १० हे दिवस फार महत्वाचे आहेत.

विशेषत: ८ व्या दिवशी दुर्गेच्या नावाने कोरडा शिधा जोगवा मागण्याची पध्दत आजही काही घराण्यात चालू आहे. यासंदर्भात एक ऐतिहासिक व ठोस संदर्भ सदैव ध्यानात ठेण्यासारखा आहे. पुढे १६७४ साली रायगडावर बत्तीस मणी संपन्न सुवर्णी. सिंहासन उठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर व नंतर रायगडावरही स्वत:ला भवानीचा भक्त (भुत्या) मानून असा जोगवा मागितला होता.

नवव्या दिवशी हवन होऊन दहाव्या दिवशी या उत्सवाच समापन होत. या दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणतात.ओदल्या नवव्या रात्रीला ‘खंडेनवमीची माळ’ म्हणतात. या दिवशी सर्व शस्त्रे पूजली जातात. काही मराठा घराण्यात बकरी पडतात.

आलीकडे बदलत्या विज्ञानयुगानुसार दुर्गाभक्त व्यवसायाप्रमाण डॉक्टर असेल तर स्टेथॉस्कोप, शस्त्रक्रियेची अवजारे, विद्यार्थी असेल तर पेन-पुस्तकेही या दिवशी पूजतात. त्यावर झेंडूच्या माळा वाहतात.

विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान ‘सोन’ म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली. पेशवाईत सरंजाम, नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ झाली.

महाराष्ट्रात आज गावोगाव ‘दसरामाळ’ आहे. या माळावर चिवाटयांच्या बंदीस्त चौकात गावचा गुरव भल्या पहाटेच आपटयाच्या किंवा शमीच्या फाद्यांचे ढिग आणून रचतो. संध्याकाळी गावच्या तालेवार मानकऱ्याकडून हा ‘सोनचौक’ सर्व प्रथम फोडला जातो. मग गावकऱ्यांची चौकातील सोन लुटण्यासाठी तिथ झुंबड उडते. हाती लागतील ते ठाळे अपूर्वान हाती वागवीत गावकरी गावाच्या ग्रामदैवताला प्रथम सोन वाहतो. मग आपल्या सर्व गावबंधुंना हे सोन देण्यासाठी त्याचा मित्रगणांसह ग्रामदौरा सुरू होतो. शेमल्यात पिवळयाजर्द कोभांचे तुरे रोवलेले शिवरायांचे मऱ्हाटमोळे ग्रामीण एकमेकांना हातच्या सोन्याची पान देतांना हटकून म्हणतात.-सोन घ्या-सोन्यासारख- ऱ्हावा। आमच सोन सांडू नगा । आमच्यासंग भांडू नगा। ‘ ते एकमेकांना निकोप गावरान प्रेमा देत उराउरी भेटतात. त्यावेळी त्यांच्या फेटाच्या शेमल्यात खोवलेले देखणे कोंभ लयीत मागेपुढे उठतात. ते बघतांना खरा महाराष्ट्र खळतो.

शिवकाळापासून ‘सिमोल्लंघनाला’ फार महत्व आल. मावळे सैनिक जवळजवळ सर्वच शेतकरी होते. ते आपआपल्या गावाकडे पावसाळाभर शेतकामात राबत.

पावसाळा संपला की, मळणी, आबादानी आवरून मावळा आपल्या बुद्रक, खुर्द वस्तीची शिव (सीमा) ओलंडून निघे. त्याच्या कमरेला तलवार असे, हाती भाला पेललेला असे, पाठीवर ढाल आवळलेली असे. आता तो शिवरायांच्या सेनेचा ‘धारकरी’ असे, हे सीमोल्लंघन तो विजयादशमीच्या सोनवाणाच्या मुहूर्तावर करे. आता त्याला ‘जिकडं पूढा-तिकड मुलूख थोडा.’ अस.

मैसूरात दस-याच्या या दिवशी नाना रंगी झुली पांघरलेले शेकडो हत्ती ‘दसरा मिरवणूकीसाठी’ रस्त्यावर येतात. बंगालात फक्त दुर्गापूजा व तिच स्तवन यासाच महत्व असत.

महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाच आहे.

तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्रे लोक संपन्न करतात.

पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर नऊ रोज नऊ माळा टांगून, विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो. दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात चाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर।.

दसरा – सीमोल्लंघन (आश्विन शुध्द दशमी)

dasra नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.

या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्त्व आहे. उत्तरभारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटयाच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात.

या दिवशी घरातील कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी साम्राज्य वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.

या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.